आलू पराठा

साहित्य :-

गव्हाचे पिठ
२ मध्यम आकाराचे शिजलेले बटाटे
१ चमचा लसूण पेस्ट
१ ते दिड चमचा हिरव्या मिरच्यांचा ठेचा
पाऊण वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
१ चमचा जिरे
१ लहान चमचा जिरेपूड
मीठ
बटर

कृती :-

१) २ ते अडीच वाट्या गव्हाचे पिठ मळून घ्यावे. चवीसाठी मिठ घालावे.
२) शिजलेले बटाटे किसून घ्यावेत त्यामुळे बटाट्याच्या गुठळ्या होणार नाहीत. त्यात लसूण पेस्ट, मिरची ठेचा, कोथिंबीर, जिरे, जिरेपूड आणि मिठ मिक्स करावे.
३) कणकेचे आणि बटाट्याच्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे समान गोळे करावे.
४) ४ इंच गोल पोळी लाटून त्यात बटाट्याच्या मिश्रणाचा एक गोळा मध्यभागी ठेवावा आणि कणकेची बाकी टोकं मध्यभागी आणून बटाट्याचे मिश्रण पूर्ण कव्हर करावे (पुरणपोळीला जसे स्टफिंग करतो तसे).
५) पोळपाटावर थोडे गव्हाचे पिठ लावावे. आणि हलक्या हाताने पराठा लाटावा. तवा गरम करावा आणि मगच पराठा त्यावर टाकावा. बटर किंवा तेलावर हा पराठा दोन्ही बाजूंनी निट भाजावा.

टीप:
१) पराठ्यात लसणीऐवजी अगदी बारीक चिरलेला कांदासुद्धा घालू शकतो.
२) पिठ अगदी सैल मळू नये, किंचीत घट्टच असावे.

Close Menu